Monday, March 7, 2011

शब्देविण संवादु.

आपण एकमेकांशी बोलतो. त्याकरता आपण "आवाज" हे माध्यम वापरतो. व "भाषा" हे साधन वापरतो. कंप्युटरची भाषा ही इलेक्ट्रिक सिग्नल असते. कंप्युटर एकमेकांशी बोलतात ते सुध्दा याच भाषेत, तसच यासाठी वायर हे माध्यम वापरले जाते (हो हो .... माहीत आहे कि सध्या सगळिकडे वायरलेसची चलती आहे  ... पण लग्गेच तोंड उचकटायलाच हवं का? सध्या जुजबी शिक्षण वायरवरती चालवुन घ्या कि) . त्यासाठी  ते "शून्य" व "एक" अश्या फक्त २ सिग्नल्स चा वापर करुन संवाद साधतात. पैकि "शून्य" म्हणजे "शून्य" व्होल्ट, आणि "एक" म्हणजे "पाच" व्होल्ट. कंप्युटरच्या बोली भाषेत या व्होल्ट्स ना "बिट्स" असं म्हणतात.

या संपूण भाषेला "बायनरी" (Binary) म्हणतात Bi - म्हणजे २. शून्य व एक अश्या दोनच सिग्नलनी ही भाषा बनते. खरतर यावरच लिहिण्यासारखं भरपुर आहे मात्र सध्या फक्त तोंड ओळख असली तरी पुरे.

बायनरी कसे काम करते उदाहरण द्यायचे झाले तर समजा "लादेन" नावाच्या कंप्युटरने "ओबामा" नावाच्या कंप्युटरला "RAM" असा शब्द पाठवला - तर समजा R = 1100,  A = 1001 आणि  M = 1010 असे बिट्स असतील तर R साठी कंप्युटर ५ व्होल्ट - ५व्होल्ट - शून्य व्होल्ट - शून्य व्होल्ट असे सिग्नल पाठवेल म्हणजे पलिकडच्या कंप्युटरला समजेल कि लादेनने R हे अक्षर पाठवले आहे. उरलेले A व M असेच पाठवेल आणि शेवटि ओबामाला "RAM" हा अख्खा शब्द मिळेल.

याचे एक टेबल सुध्दा खाली बघायला मिळेल. जास्त डोकं खाजवण्याची गरज नाही. या ठिकाणी १०२४ ही संख्या लक्षात ठेवली कि पाऊण टेबल पाठ झालंच म्हणून समजा -


· 1 Bit = Binary Digit (0 or 1)
· 8 Bits = 1 Byte
· 1024 Bytes = 1 Kilobyte
· 1024 Kilobytes = 1 Megabyte
· 1024 Megabytes = 1 Gigabyte
· 1024 Gigabytes = 1 Terabyte
· 1024 Terabytes = 1 Petabyte
· 1024 Petabytes = 1 Exabyte
· 1024 Exabytes = 1 Zettabyte
· 1024 Zettabytes = 1 Yottabyte
· 1024 Yottabytes = 1 Brontobyte
· 1024 Brontobytes = 1 Geopbyte

अजून सोप्पं हवं असेल तर खालचा व्हिडिओ बघा - 


वरीलपैकि साधारणत: पेटाबाइट्पर्यंतच रोजच्या आयुष्यात डेटा बॅक अप वगैरे करताना गरज लागते. मात्र मोठे संशोधन असेल तर कधी कधी जमा होणारा डेटा झेटाबाइटपर्यंत जातो उदा. "large Hadron Collider " मध्ये विश्व निर्मितीचा मागोवा घेत आहेत, तिथे एका टक्करी मध्ये जी माहीती मिळते तीच एकावेळि शेकडो GB ची असते. अश्यावेळि भरपुर माहितीला प्रोसेस करावे लागते पाठवावे लागते साठवावे लागते. किंवा आजकाल जी-मेल, रेडिफ, मायब्लूप वगैरे अनलिमिटेड स्पेस देत आहेत (निदान ते तरी असं म्हणतात :-D ) त्यांना अश्या राक्षसी डेटा वेअरहाऊसेस नक्किच लागतात.

याच बायनरी वरुन पुढे कंप्युटर मध्ये क्रमश: "डेसिमल", "हेक्झाडेसिमल" व "ऑक्टल" पध्दत अंमलात आणली बायनरीचे वरील सिस्टिम्समध्ये रुपांतरण करुन ती वापरली जाते. पण हे "साठवण्याचे" झाले "पाठवण्याचे" काय??

तर याच "पाठवण्याच्या" स्पीडला आपण "बॅन्डविड्थ" म्हणतो - एका सेकंदात वायर मधुन किती बिट्स पाठवले जातात त्यावरुन त्याची "बॅन्डविड्थ" काढली जाते.

बिट्स/सेकंद = बॅन्डविड्थ.

 सध्याचं सर्वात वेगवान माध्यम म्हणजे अर्थात फायबर ऑप्टिक तर 10GBPS ++ हि सध्या उपलब्ध असलेली सर्वात वेगवान बॅन्डविड्थ आहे. (लक्षात घ्या "बॅन्डविड्थ" आणि "ब्रॉडबॅन्ड" मध्ये फरक आहे काय तो पुढे येईलच). अर्थात प्रत्येक वायरच्या प्रकारापासून अथवा हब पासून ते राउटरपर्यंतच्या साधनांच्या शक्ती/वापरानुसार हा वेग बदलत असतो. त्याची माहिती हळु हळु घेउयाच .... पण हा शब्देविण होत असलेला संवादु रोजच्या आयुष्यात एकमेकांना असे शून्य - पाच च्या व्होल्ट्सचे धक्के देऊन आपल्याला करावा लागत नाही हे आपले नशिब नाही का???? बिच्चारा कंप्युटर रोज असे करोडो सिग्नल्स काही सेकंदात स्वीकारतो - धाडतो त्यावर प्रोसेस करतो व आपल्याला समोर एखादा इ-मेल, एखादा करतीनाचा ढिन्चॅक फोटो, जवान शीलाचा नाच, किंवा मित्र - मैत्रिणींचा "हॅल्लो" आणून ठेवतो ..... यार कितने पापड पेलनें पडते है उसको .... म्हणून कधी कंप्युटर हॅन्ग झाला तर त्याच्यावर चिडुन मॉनिटरच्या कानफटात मारण्याऐवजी थोडि भुतदया दाखवत जा!!!

 - सौरभ वैशंपायन.

No comments: