Monday, March 7, 2011

शब्देविण संवादु.

आपण एकमेकांशी बोलतो. त्याकरता आपण "आवाज" हे माध्यम वापरतो. व "भाषा" हे साधन वापरतो. कंप्युटरची भाषा ही इलेक्ट्रिक सिग्नल असते. कंप्युटर एकमेकांशी बोलतात ते सुध्दा याच भाषेत, तसच यासाठी वायर हे माध्यम वापरले जाते (हो हो .... माहीत आहे कि सध्या सगळिकडे वायरलेसची चलती आहे  ... पण लग्गेच तोंड उचकटायलाच हवं का? सध्या जुजबी शिक्षण वायरवरती चालवुन घ्या कि) . त्यासाठी  ते "शून्य" व "एक" अश्या फक्त २ सिग्नल्स चा वापर करुन संवाद साधतात. पैकि "शून्य" म्हणजे "शून्य" व्होल्ट, आणि "एक" म्हणजे "पाच" व्होल्ट. कंप्युटरच्या बोली भाषेत या व्होल्ट्स ना "बिट्स" असं म्हणतात.

या संपूण भाषेला "बायनरी" (Binary) म्हणतात Bi - म्हणजे २. शून्य व एक अश्या दोनच सिग्नलनी ही भाषा बनते. खरतर यावरच लिहिण्यासारखं भरपुर आहे मात्र सध्या फक्त तोंड ओळख असली तरी पुरे.

बायनरी कसे काम करते उदाहरण द्यायचे झाले तर समजा "लादेन" नावाच्या कंप्युटरने "ओबामा" नावाच्या कंप्युटरला "RAM" असा शब्द पाठवला - तर समजा R = 1100,  A = 1001 आणि  M = 1010 असे बिट्स असतील तर R साठी कंप्युटर ५ व्होल्ट - ५व्होल्ट - शून्य व्होल्ट - शून्य व्होल्ट असे सिग्नल पाठवेल म्हणजे पलिकडच्या कंप्युटरला समजेल कि लादेनने R हे अक्षर पाठवले आहे. उरलेले A व M असेच पाठवेल आणि शेवटि ओबामाला "RAM" हा अख्खा शब्द मिळेल.

याचे एक टेबल सुध्दा खाली बघायला मिळेल. जास्त डोकं खाजवण्याची गरज नाही. या ठिकाणी १०२४ ही संख्या लक्षात ठेवली कि पाऊण टेबल पाठ झालंच म्हणून समजा -


· 1 Bit = Binary Digit (0 or 1)
· 8 Bits = 1 Byte
· 1024 Bytes = 1 Kilobyte
· 1024 Kilobytes = 1 Megabyte
· 1024 Megabytes = 1 Gigabyte
· 1024 Gigabytes = 1 Terabyte
· 1024 Terabytes = 1 Petabyte
· 1024 Petabytes = 1 Exabyte
· 1024 Exabytes = 1 Zettabyte
· 1024 Zettabytes = 1 Yottabyte
· 1024 Yottabytes = 1 Brontobyte
· 1024 Brontobytes = 1 Geopbyte

अजून सोप्पं हवं असेल तर खालचा व्हिडिओ बघा - 


वरीलपैकि साधारणत: पेटाबाइट्पर्यंतच रोजच्या आयुष्यात डेटा बॅक अप वगैरे करताना गरज लागते. मात्र मोठे संशोधन असेल तर कधी कधी जमा होणारा डेटा झेटाबाइटपर्यंत जातो उदा. "large Hadron Collider " मध्ये विश्व निर्मितीचा मागोवा घेत आहेत, तिथे एका टक्करी मध्ये जी माहीती मिळते तीच एकावेळि शेकडो GB ची असते. अश्यावेळि भरपुर माहितीला प्रोसेस करावे लागते पाठवावे लागते साठवावे लागते. किंवा आजकाल जी-मेल, रेडिफ, मायब्लूप वगैरे अनलिमिटेड स्पेस देत आहेत (निदान ते तरी असं म्हणतात :-D ) त्यांना अश्या राक्षसी डेटा वेअरहाऊसेस नक्किच लागतात.

याच बायनरी वरुन पुढे कंप्युटर मध्ये क्रमश: "डेसिमल", "हेक्झाडेसिमल" व "ऑक्टल" पध्दत अंमलात आणली बायनरीचे वरील सिस्टिम्समध्ये रुपांतरण करुन ती वापरली जाते. पण हे "साठवण्याचे" झाले "पाठवण्याचे" काय??

तर याच "पाठवण्याच्या" स्पीडला आपण "बॅन्डविड्थ" म्हणतो - एका सेकंदात वायर मधुन किती बिट्स पाठवले जातात त्यावरुन त्याची "बॅन्डविड्थ" काढली जाते.

बिट्स/सेकंद = बॅन्डविड्थ.

 सध्याचं सर्वात वेगवान माध्यम म्हणजे अर्थात फायबर ऑप्टिक तर 10GBPS ++ हि सध्या उपलब्ध असलेली सर्वात वेगवान बॅन्डविड्थ आहे. (लक्षात घ्या "बॅन्डविड्थ" आणि "ब्रॉडबॅन्ड" मध्ये फरक आहे काय तो पुढे येईलच). अर्थात प्रत्येक वायरच्या प्रकारापासून अथवा हब पासून ते राउटरपर्यंतच्या साधनांच्या शक्ती/वापरानुसार हा वेग बदलत असतो. त्याची माहिती हळु हळु घेउयाच .... पण हा शब्देविण होत असलेला संवादु रोजच्या आयुष्यात एकमेकांना असे शून्य - पाच च्या व्होल्ट्सचे धक्के देऊन आपल्याला करावा लागत नाही हे आपले नशिब नाही का???? बिच्चारा कंप्युटर रोज असे करोडो सिग्नल्स काही सेकंदात स्वीकारतो - धाडतो त्यावर प्रोसेस करतो व आपल्याला समोर एखादा इ-मेल, एखादा करतीनाचा ढिन्चॅक फोटो, जवान शीलाचा नाच, किंवा मित्र - मैत्रिणींचा "हॅल्लो" आणून ठेवतो ..... यार कितने पापड पेलनें पडते है उसको .... म्हणून कधी कंप्युटर हॅन्ग झाला तर त्याच्यावर चिडुन मॉनिटरच्या कानफटात मारण्याऐवजी थोडि भुतदया दाखवत जा!!!

 - सौरभ वैशंपायन.

Sunday, March 6, 2011

नॉट वर्किंग ते नेटवर्किंग!

समजा तुम्हांला कोणी विचारले कि "जगातली सर्वात "पॉवरफुल" टेक्नोलॉजि कुठली?" तर क्षणाचाही विलंब न लावता खुषाल सांगा - "नेटवर्किंग" आणि समोरचा तरीही मानायला तयार नसेल तर ..... नेटवर्क पोर्ट उचकटून काढा त्याच्या PC मधून ..... लग्गेच समजेल!!! :-D  मस्करीचा भाग सोडा, पण खरच नेटवर्किंग शिवाय जगाचा श्वास थांबेल.  कारण  जगाच्या कानाकोपर्‍यात आज नेटवर्किंग पोहोचले आहे. व्हॉइस - व्हिडीओ - डेटा तीनही गोष्टि आज केवळ नेटवर्किंगमुळे जगातल्या एका कोपर्‍यापासून दुसर्‍या कोपर्‍यापर्यंत पोहोचतात. आपण फोन वरती बोलतो त्याचे डिजिटल सिग्नलमध्ये रुपांतर होते व जमीनीवर - समुद्रातून हज्जारो किमी पसरलेल्या फायबर ऑप्टिक्समधून  प्रवास करुन ते दुसर्‍याला ऐकु जाते, आपण इ-मेल पाठवतो त्यात टेक्स्ट, फोटो, ऑडिओ, व्हिडिओ या आणि अश्या अनेक गोष्टि अटॅच करुन पाठवतो, आपण तासन तास कि बोर्ड बडवून चॅट करतो, जगातल्या कुठल्याश्या एका ATM सेंटरमधुन पैसे काढतो त्याची नोंद आपल्या बॅंकच्या खात्यात होते, जगाच्या दोन टोकांवर असलेल्या व्यक्ती समोरा समोर बसून बोलावे तसे व्हिडिओ कॉन्फर्न्सिंग करतात, हॅकर्स एखादि साईट हॅक करतात, सर्च इंजिन वरती एखादा शब्द टाईप करुन एन्टर कि दाबली कि १-२ सेकंदात काही लाख रीजल्ट तो तुमच्या समोर ठेवतो ..... या सगळ्याऽऽ मागे "नेटवर्किंग" आहे. आणि आत्ता तुम्हि माझा लेख वाचता आहात तेही नेटवर्किंग मुळेच. नेटवर्क पोर्ट मधली वायर बाजूला काढा कि तुमच्याही कंप्युटरचा "डब्बा" झालाच .... मग खेळा त्यावर व्हिडिओ गेम.  :-p


मी तर म्हणिन कि आर्मी नंतर नेटवर्किंगवालेच देश चालवतात .... अतिरंजित करतोय असं वाटत असेल तर एक शक्यता विचारात घ्या आपली NSE, BSE आणि आपल्यासारखीच जगभरात वेगवेगळी "एक्सचेंज" आहेत.  समजा टेक्निकल कारणांनी किंवा मानव निर्मित कारणांनी यांची साईट त्याच्या लाखो मेंबर्सना/गुंतवणूकदारांना ती एक तास वापरता आली नाहि .... काही करोडचे नुकसान होईल. एक  दिवस नाही वापरता आली काहि शे करोडचे नुकसान होईल, काही दिवस वापरता आली नाही तर काही हजार करोड रुपयांचे नुकसान होईल व आठवडाभर बंद राहीली तर अर्थव्यवस्थेला धक्का लागेल. आणि एकाच देशाच्या नव्हे तर जगभरातील अर्थ व्यवस्थेला फटका बसेल कारण आज जगभरातील सगळि एक्सचेंज्स एकमेकांना जोडलेली आहेत. अर्थात असं होत नाही कारण त्याच्या मागे आधीच या सगळ्याचा विचार करुन त्यावर आगाऊ उपाय योजना केल्या असतात. पण हे नाकारता नक्किच येत नाहि. अनेकदा या साईट खरच दिवसभरा करता मिळत नाहीत त्या मागची अनेक तांत्रिक कारणे असतात ती कधीतरी सांगेनच. पण सांगण्याचा मुद्दा नेटवर्किंगवाले "लई भारी" आहेत. थोडक्यात "नॉट वर्किंग" असलेल्या गोष्टि नेटवर्किंगमुळे चालतात म्हणायला हरकत नाही.


पण नेटवर्किंग म्हणजे नुसते कंप्युटरच्या मागचा RJ-45 चा कनेक्टर लावणे नव्हे. नेटवर्किंग असीम आहे, अजून नवे शोध लागतच आहेत लागतच राहतील. इथे मला जमेल तशी नेटवर्किंगची माहीती शक्य तितकि सोप्पी करुन तुम्हांला देत जाईन. मी त्यातला तज्ञ नाही पण चांगला विद्यार्थी नक्किच आहे. सो एन्जॉ‌ऽऽऽय!

 - सौरभ वैशंपायन.