मुळात कंप्युटर आणि त्याच्याशी संबधित गोष्टिच अश्या आहेत कि रोज नवे काहीतरी शोध लावले जातच असतात, त्यात नव्याने भर पडत असते. मग नेटवर्किंग कसे वेगळे राहिल? पण साधारण दोन कंप्युटर जोडण्यापासून झालेली सुरुवात थेट इंटरनेटच्या जाळ्यापर्यंत जाऊन पोचते (थांबते असं म्हणताच येणार नाही!). आपण नेहमी लॅन - मॅन - वॅन असे शब्द ऐकतो - वापरतो पण नेमकं लॅन-वॅन म्हणजे काय? कोणाला नीट शब्दांत नाही सांगता येत. गुगलवरती LAN, WAN टाईप केलं तर माहीती देणार्या भरमसाठ लिंक मिळतीलही पण आपण जरा सोपं आणि सरळ समजुन घेऊ.
लॅन - "जेव्हा २ किंवा जास्त कंप्युटर किंवा नेटवर्किंगची उपकरणे (Devices like - hub, bridge, switches, Routers etc) जेव्हा एका रुममध्ये, एका मजल्यावर, एकाच बिल्डिंगमध्ये किंवा एका मर्यादित क्षेत्रात (कॅम्पस/प्रिमायसेस) असतील व ते एकमेकांशी जोडलेले असतील तर ते "लॅन" वरती आहे असं म्हणता येईल.
आता यात "मर्यादित क्षेत्र" म्हणजे किती? असा सहाजिक प्रश्न येईल तर एका दृष्टिने ते हब किंवा स्वीचेस वापरुन कितीही वाढवत जाता येईल तरी साधारणत: एखाद्या रुमपासुन ते एखाद्या मोठ्या विद्यापिठाचे क्षेत्र असा लॅनचा आकार असतो असे म्हणता येते.
मॅन - "जेव्हा २ किंवा जास्त कंप्युटर किंवा नेटवर्किंगची उपकरणे किंवा दोन किंवा त्यापेक्षा जास्त वेगवेगळि नेटवर्क्स भौगोलिक दृष्ट्या दुर असतील मात्र ती एकाच शहरात असतील व ती एकमेकांशी जोडलेली असतील तर ते मॅनवरती कनेक्टेड आहेत असे म्हणता येईल."
वॅन - "जेव्हा २ किंवा जास्त कंप्युटर किंवा नेटवर्किंगची उपकरणे किंवा दोन किंवा त्यापेक्षा जास्त वेगवेगळि नेटवर्क्स भौगोलिक दृष्ट्या दुर असतील आणि ती दोन वेगवेगळ्या शहरात असतील, ती एकमेकांशी जोडलेली असतील तर मात्र तर ते वॅनने जोडले आहेत असे म्हणतात."
लॅनचं क्षेत्र मर्यादित असतं त्यावर तुलनेने जास्त खर्च होत नाही मात्र मॅन व वॅन साठी शेकडो - हजारो किलोमीटर्सच्या फायबर ऑप्टिकचे जाळे शहरांत, राज्यात, देशात व जगभर विणले असते इतकेच काय? समुद्रामधुन शेकडो किलोमीटरच्या या वायर एका देशातून दुसर्या देशांत गेलेल्या असतात व आपण जे ISD कॉल करतो ते काही सॅटलाइट ने जात नाहीत, तर ह्या "वेटफायबर्स किंवा वेटलिंक्स" मधुन जातात. यांची जाळी पसरवायला NLD (National Long Distance) व ILD (International Long Distance) ची लायसन्स सरकार काढतं व त्या त्या देशातील टेलिफोन ऑपरेटिंग कंपनीज त्यात गुंतवणूक करुन किंवा सरकारशी भागीदारी करुन आपापल्या नेटवर्क्सचे जाळे विणतात. याशिवाय SEMEWE 4 सारख्या संस्था यावर लक्ष ठेवणे, नविन कनेक्शन्सचा विचार करणे व योजना आखण्याची कामे करत असतात. त्यातुन फायबर ऑप्टिकसचे आंतरखंडिय जाळे विणले जाते वाढत जाते.
लॅन - मॅन - वॅन कसे असतात ते आपण पाहिलं त्यांच्यावर जो डेटा प्रवास करतो त्याबद्दल थोडसं -
कुठलाही डेटा हा मुख्यत: "व्हॉइस, व्हिडिओ आणि डेटा (टेक्स्ट आणि पिक्चर वगैरे)" यात विभागलेला असतो. यांना थ्री प्ले सर्व्हिसेस म्हणतात. पैकि व्हॉइस आणि व्हिडिओ या रीअल टाईम सर्व्हिसेस आहेत म्हणजे यात डेटा योग्य प्रकारे पोहोचेल याची खात्री असते तर डेटा ही बेस्ट एफर्ट सर्व्हिस आहे, म्हणजे "डेटा" देवाला सोडल्या बैलासारखा निघाला आहे वाहत वाहत दुसर्या टोकाला पोहोचेल तेव्हा पोहोचेल अशी परीस्थीती असते. या रीअल टाईम किंवा बेस्ट एफर्ट या प्रकाराला "क्वालिटि ऑफ सर्व्हिस" असं म्हणतात. इंटरनेटवरती "Quality Of Service" म्हणून सर्च केलात तर भरदोल मध्ये माहीती घेता येईल. सध्या सांगायचे तर "Quality Of Service" महत्वाची असते, त्याच्यानुसार समजा डेटा - व्हॉईस - व्हिडिओ यांची पॅकेट्स/फ्रेम्स जर मिडियावरती (Routerच्या एन्ट्रि पोर्टला) लाईनमध्ये आली तर आधी व्हॉईसच्या पॅकेट्सना एन्ट्रि द्यावी लागते, मग व्हिडिओच्या आणि मग देवाला सोडलेल्या बैलाला म्हणजे डेटाला. यातहि या सर्व्हिसेसच्या क्रमवारीचे निकष आणि नियम ठरवता येतात, पण अलिखित नियमानुसार असलेली क्रमवारी मात्र अश्याच उतरंडिने असते. या मागचे कारण - जर फोनमधुन किंवा कंप्युटरवरती व्हॉइस चॅट मधला दोन अक्षरांतला - शब्दांतला आवाज थांबुन थांबुन आला तर ऐकायला कसं विचित्र वाटेल? ह्या आवाजतल्या अडथळ्याला "जिटर"(Jitter) म्हणतात. व्हॉईस हा Delay/Latency सेन्सेटिव्ह असतो. मात्र तेच व्हिडिओ बाबत व्हिडिओ थांबुन थांबून आला तरी "बफरिंग" च्या नावाखाली ते खपूसुध्दा शकतं (नपेक्षा ते बर्याच अंशी तसंच असतं, अर्थात आता स्काइप, जी-चॅट यांच्या व्हिडिओ कॉलची सर्व्हिस हाय डेफिनेशनच्या लेव्हलपर्यंत मिळते त्यामुळे वर म्हणालो ती "Quality Of Service" अति उच्च दर्जाची असते सो टेन्शन लेने का नहीं). थोडक्यात व्हिडिओ होणारा उशीर काहि अंशी चालवुन घेऊ शकतो आणि डेटा काय रमत गमत पोहोचेल तेव्हा पोहोचेल.
थोडक्यात कॅफेत दोन कंप्युटर्सवरती बसून IGI किंवा मारधाडिचे, कार रेसचे झक्कास गेम खेळण्यापासून ते दुसर्या शहरातल्या कोणाशी चॅट करेपर्यंत किंवा अमेरीकेतल्या क्लायंटशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग करणं नेटवर्किंग यत्र - तत्र - सर्वत्र आहे. आणि दोन कंप्युटर्सपासून ते इंटरनेटच्या महाजंजाळापर्यंत पसरलेले हे विश्व दिवसेंदिवस वाढत जात आहे आणि वाढतच जाणार आहे .... कदाचित काही शे वर्षांनी समजा खरच दुसर्या ग्रहांवर मानवी वस्ती झाली, तर दोन ग्रहांच्या मध्ये सुध्दा नविनच प्रकारचे एखादे कनेक्शन तयार करावे लागेल व तेव्हा खरोखर म्हणावे लागेल - "वाढता वाढता वाढे, भेदिले सूर्यमंडळा"
- सौरभ वैशंपायन